नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोलिस असल्याची बतावणी करीत रस्त्याने पायी जाणा-या ५० वर्षीय महिलेची वाट अडवित ३० हजार रूपये किमतीचे दागिणे तोतया पोलिसांनी लंपास केले. पुढे चाकू हल्ला झाल्याचे सांगत महिलेचे अलंकार सुरक्षित ठेवण्यास मदत करण्याचा बहाणा करून ही चोरी करण्यात आली. याप्रकरणी रेखा रमेश पालवे (रा.राजराजेश्वरी जवळ, त्रिमुर्ती नगर, जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालवे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. परिसरातील राजराजेश्वरी जवळून त्या पायी जात असतांना दोघा भामट्यांनी त्यांना अडविले. यावेळी पोलिस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी महिलेस पुढे चाकू हल्ला झाला असून चेकिंग सुरू असल्याचे सांगितले.
याप्रसंगी त्यांनी अंगावरील दागिणे सुरक्षीत ठेवण्याचा सल्ला देत दागिण पिशवीत ठेवण्यास मदत केली. घरी जावून महिलेने पिशवी तपासली असता भामट्यांनी गळयातील पोत व कानातले असे सुमारे २९ हजार रूपये किमतीचे दागिणे हातोहात लांबविल्याची बाब समोर आली. अधिक तपास उपनिरीक्षक मुंन्तोडे करीत आहेत.
घरातून लॅपटॉप लांबवला
बळी मंदिर परिरात उघड्या घरातून विद्यार्थीनीचा लॅपटॉप चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी मोनाली विक्रम क्षिरसागर (२२ रा.केडगाव जि.अ.नगर हल्ली कृष्णा रो हाऊस,माने गार्डन शेजारी सरस्वतीनगर) यांनी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोनाली क्षिरसागर ही विद्यार्थी मैत्रिणीसमवेत सरस्वतीनगर येथे वास्तव्यास आहे. गेल्या २० मे रोजी सर्व मुली जेवणासाठी गेल्या असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात घुसून सुमारे दहा हजार रूपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. अधिक तपास पोलिस नाईक बनकर करीत आहेत.