नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अशोकामार्ग भागात फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या ६७ वर्षीय महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या आधारे भामट्यांचा माग काढत आहेत.
रत्ना एकनाथ गांगुर्डे (रा.एकरत्न निवास,दत्तनगर अशोकामार्ग) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गांगुर्डे या बुधवारी (दि.३१) रात्री जेवण आटोपून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली.
परिसरातील सिध्देश रेसिडेन्सीच्या गेट समोरून त्या पायी जात असतांना दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ६० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक बाळू गिते करीत आहेत.
५१ हजार रूपये किमतीची कॉपर वायरची चोरी
औरंगाबाद रोडवरील कपालेश्वरनगर भागात बांधकाम साईटच्या मोकळ्य़ा जागेत पडलेली कॉपर वायर चोरून नेल्याची घटना घडली. ५१ हजार रूपये किमतीची वायरवर चोरट्यानी डल्ला मारला असून याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चैतेश सदाशिव जगताप (रा.गुरूदत्तनगर सोसायटी, समर्थनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जगताप यांच्या औरंगाबाद रोडवरील कपालेश्वरनगर येथे गौरव प्राईड नावाच्या बिल्डींगचे काम सुरू आहे. या बांधकाम साईटच्या आवारात ठेवलेली सुमारे ५१ हजार रूपये किमतीची कॉपर वायर चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि.३१) रात्री घडली. अधिक तपास हवालदार कहांडळ करीत आहेत.