नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूररोडवरील व्होरायजन अॅकेडमी भागात रस्त्याने पायी जाणा-या वृध्दाची वाट अडवित विनानंबर प्लेट असलेल्या पल्सरस्वारांनी दागिने लंपास केले. बोलण्यात गुंतवून भामट्यांनी वृध्दाच्या गळयातील सोनसाखळी आणि अंगठी चोरुन नेली. याप्रकरणी नरेंद्र प्रमानंद हरियानी (७५ रा.वसंत विहार कॉलनी, गंगापूररोड) यांनी तक्रार दाखल केली असून गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरियानी गुरूवारी (दि.४) नेहमीप्रमाणे आपल्या राहत्या परिसरात फेरफटका मारत असतांना ही घटना घडली. व्होरायजन अॅकेडमी समोरील गल्लीतून ते फेरफटका मारत असतांना डॉ.मते दवाखान्याजवळ विना नबरप्लेट असलेल्या पल्सरस्वारांनी त्यांची वाट अडविली.
यावेळी दोघा भामट्यांनी हरियानी यांच्या समवेत फिरण्याचा बहाणा करून तसेच बोलण्यात गुंतवून एकाने हात हातात घेत तर दुस-याने गळयात हात टाकून त्यांच्या गळयातील सोनसाखळी व अंगठी असा सुमारे ९० हजाराचे अलंकार हातोहात लांबविले. अधिक तपास उपनिरीक्षक भिसे करीत आहेत.