नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिरावाडी परिसरात झालेल्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेला संशयिताला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. तेव्हापासून फरार झालेल्या संशयिताला अखेर शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केलीय. निलेश विनायक कोळेकर असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्यास २०१७ मध्ये जिल्हा न्यायालयाने जाहीरनामा काढून फरारी घोषित केले होते. निलेश आणि त्याच्या साथीदारांनी पंचवटीतील हिरावाडीत २००९ मध्ये अज्ञात कारणातून दिनेश कदम याचा खून केला होता.
पंचवटी पोलिसांत याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करून निलेश आणि त्याच्या साथीदारांना अटक केली होती. दरम्यान जिल्हा न्यायालयाने निलेश यास सशर्त जामीन मंजूर केल्याने तो तेव्हापासून फरार झाला होता. त्याच्याविरोधात २०१७ मध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाने खूनाच्या गुन्ह्यात जाहीरनामा प्रसिद्ध करून तो मुदतीत न्यायालयात हजर न झाल्याने त्यास फरार घोषित केले होते.
त्या अनुषंगाने सरकारवाडा पोलिसांत २०१७ मध्ये तो फरार असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पथक गस्तीवर असताना निलेशची खबर मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला शिताफीने अटक केली. फरार घोषित असल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलिसांत दाखल असल्याने त्याचा ताबा सरकारवाडा पोलिसांकडे देण्यात आला.