नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विषारी औषध सेवन करीत शहरातील वेगवेगळय़ा भागात राहणा-या दोघांनी रविवारी आत्महत्या केली. अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन करीत दोघांनी आपले जीवन संपविले असून त्यात एका १८ वर्षीय तरूणीचा समावेश आहे. याप्रकरणी सातपूर आणि गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
वासाळी येथे पहिली घटना
सखाराम भाऊराव दिवे (४५ रा.वासळी ता.जि.नाशिक) यांनी आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ.यशराज गायकवाड यांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक भड करीत आहेत.
ध्रुवनगरमध्ये दुसरी घटना
दुसरी घटना औद्योगिक वसाहतीतील ध्रुवनगर भागात घडली. सोनाली भारत बेंडकुळे (१८ रा. मोतीवाला कॉलेजजवळ, ध्रुवनगर) या युवतीने रविवारी आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच भाऊ रमेश बेंडकुळे यांनी तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ.निखील गुप्ता यांनी तिला मृत घोषीत केले. याबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक महाले करीत आहेत.