नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर – त्र्यंबकरोडवर दुचाकीवर बेकायदा दारू विक्री करणा-या तरूणावर पोलिसांनी कारवाई करत त्याच्या ताब्यातून दुचाकीसह मद्यसाठा असा सुमारे साडे ५८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिषेक प्रशांत गौतम (२६ रा.पुष्कराज जनरल स्टोअर्स समोर त्रिमुर्ती चौक,सिडको) असे कारवाई करण्यात आलेल्या दारू विक्रेत्याचे नाव आहे. सातपूर त्र्यंबकरोडवर एक तरूण दुचाकीवर दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.४) पोलिसानी धाव घेत संशयिताच्या दुचाकीची तपासणी केली असता त्यात देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या.
या कारवाईत एमएच १५ ईआर ९७८ या दुचाकीसह मद्यसाठा असा सुमारे ५८ हजार ३६० रूपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी अंमलदार सागर गुंजाळ यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलिस नाईक वाघमारे करीत आहेत.
५८ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
५८ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात घडली. धारासिंग भाऊसिंग निकम (५८ रा.जगदंबा रो हाऊस,सात माऊली चौक,श्रमिकनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. निकम यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
निकम यांनी गुरूवारी (दि.४) सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील किचन मध्ये अज्ञात कारणातून पंख्याच्या लोखंडी अँगलला उपरणे बांधून गळफास लावून घेतला त्यात त्यांचा मृत्यू झाला. उदयसिंग निकम यांनी दिलेल्या खबरीवरून सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भड करीत आहेत.