नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दुसऱ्याच्या मिळकतीवर (जमिनीवर) कब्जा करण्याचा प्रयत्न करणा-या दोघा संशयितांविरुध्द पंचवटी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान अशोक अहिरे व मुकूल प्रकाश पटेल अशी दुस-याच्या मिळकतीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करणा-या दोघा संशयितांची नावे आहेत. वॉचमनला शिवीगाळ व दमदाटी करीत दुसऱ्याच्या मिळकतीवर या दोघांनी बेकायदा कब्जा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा प्रकार समोर आला आहे.
मुळ मालकाने धाव घेत जाब विचारला असता संशयितांनी बनावट दस्तऐवज हातावर ठेवले. त्यानंतर मुळमालकाने या फसवणूक प्रकरणी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. याप्रकरणी राजेंद्र रसिकलाल शाह (रा.पंडीत कॉलनी, शरणपूररोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. शाह यांची दिंडोरीरोडवरील तलाठी कॉलनी परिसरात सर्व्हे नं. १६२ मध्ये मिळकत आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी वॉचमनला शिवीगाळ व दमदाटी करीत या मिळकतीवर संशयितांनी बेकायदा प्रवेश करून मालकी हक्का बाबत बोर्ड लावून पत्र्याचे शेड उभारले होते.
या अतिक्रमणाची माहिती मिळाल्याने मंगळवारी (दि.२०) शाह यांनी आपल्या मालकिच्या भुखंडावरील अतिक्रमणाची पाहणी केली असता हा प्रकार समोर आला. त्यानंतर शाह यांनी संशयितांची भेट घेतली असता त्यांनी बनावट सही शिक्का असलेले नोटरी वकिलाचे कागदपत्र हातावर ठेवले. संशयितांचा बनावट प्रकार समोर येताच शाह यांनी पोलिसात धाव घेतली असून पोलिसांनी दोघा ठकबाजांविरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रोहित केदार करीत आहेत.