नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेलरोड परिसरात फ्लॅटमध्ये गळा चिरून खून केल्याप्रकरणी मुख्य आरोपीसह एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अवघ्या २४ तासात युनिट एकच्या पथकाने या खूनाचा उलगडा करुन आरोपीला गजाआड केले आहे. संशयित तुषार सिद्धार्थ पवार (वय २९, रा. त्रिवेणी पार्क, इंद्र प्लाझा सोसायटी, जेलरोड, नाशिकरोड) व त्याचा मित्र अल्पवयीन मुलगा या खूनात आरोपी आहे. या खूनातील आरोपींचा उपनगर पोलीस ठाण्याचे पथक व गुन्हे शाखेचे पथक तपास करीत होते. आडगाव ते दहाव्या मैलाच्या दरम्यान ते दोघे आरोपी आले असता गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने त्यांच्या मुसक्या आवळल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की संशयित तुषार पवार व त्याचा अल्पवयीन मित्र हे २८ मे रोजी प्रवीण दिवेकर याच्याकडे सायंकाळी पाच वाजता जेवणासाठी व दारू पिण्यासाठी गेले होते. या पार्टीतच प्रवीण याने आरोपी तुषार पवार यास मी तुला मनसेचे पद देतो, तू मला तुझ्या वडिलांकडून १५ हजार रुपये घेऊन दे, असे सांगितले. त्याला तुषार पवार याने नकार दिला. त्यानंतर वादावादीला सुरुवात झाली व त्याचे पर्यावसन मारामारीत झाले. त्यानंतर प्रवीणवर तुषारने गळ्यावर व छातीवर चाकूचे वार केले व बिअरच्या बाटल्या डोक्यात फोडल्या. त्यानंतर प्रवीण रक्ताच्या थारोळ्यात तेथेच कोसळला.
मोबाईल घेऊन त्र्यंबकेश्वरला पळाले
प्रवीण याने कोणाला कॉल करू नये म्हणून त्याचा मोबाईल घेऊन दोन्ही आरोपी प्रवीणच्या मोटरसायकलने त्र्यंबकेश्वरला पळून गेले. त्र्यंबकेश्वरला त्यांनी चाकू एका ठिकाणी लपविला व दुसर्या आरोपीने कपड्यांवर रक्त असल्यामुळे ते त्यांनी जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते आडगावच्या हद्दीत आले.