नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील महात्मा गांधी रस्त्यांवरील मोबाईल दुकानांवर पोलिसांनी छापे टाकून बनावट अॅडोप्टरबॅक पॅनल, इअर बर्ड आदी साहित्य जप्त केले. अॅपल या नामांकित कंपनीच्या बनावट स्पेअर पार्ट विक्रीच्या पार्श्वभूमिवर हा छापा टाकण्यात आला.
या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, अॅपल कंपनीचे बनावट साहित्य विक्री होत असल्याची माहिती कंपनीला मिळाल्याने बुधवारी कंपनी प्रतिनिधींनी नाशकात धाव घेत पोलिसांच्या मदतीने छापे टाकले. शहर गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकास सोबत घेवून ही कारवाई करण्यात आली. दुपारच्या सुमारास या भागातील शिवम सेल्स, शिवशक्ती, प्रवीण, पटेल आदी दुकानांची पथकांनी छाननी सुरू केली. मात्र याची कुणकुण अन्य दुकानदारांना लागल्याने आसपासच्या विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद केली.
खरेदीसाठी आलेले ग्राहक नेमके काय सुरू आहे हे पाहण्यात दंग झाले. त्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली. या कारवाईत पाच दुकानांमधून अॅपल कंपनीच्या नावाने विकल्या जाणा-या विविध प्रकारचे बनावट साहित्य जप्त करण्यात आल्याचे युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी सांगितले.