नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुने नाशिकमधील तलावडी भागात आणि शिंदे गावात छापेमारी करीत दोन जुगार अड्डे शहर पोलिसांनी उदध्वस्त केले. या कारवाई २० हून अधिक जुगारींवर कारवाई करीत पोलिसांनी रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत केले. याप्रकरणी भद्रकाली आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात जुगार अधिनियम कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तलावडीतील एका इमारतीत जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्याने मंगळवारी (दि.९) सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला असता सादिक सलीम सय्यद,प्रविण भास्कर रणधिरे,सुधिर किसन जगताप व अन्य तेरा जुगारी मेमन बिल्डींगच्या मागच्या दरवाजाने तळमजल्यावर बंदीस्त जागी अंक अकड्यांवर पैसे लावून टाईम,डी मिलन,कल्याण क्लोज,कल्याण मटका आणि सोरट जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून १८ हजार ९४४ रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य असा ऐवज हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी पोलिस नाईक कय्युम सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खांडवी करीत आहेत. दुसरी कारवाई शिंदे गावात करण्यात आली. देविदास साळवे यांच्या शेताच्या बंधाºयाजवळ काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुुसार मंगळवारी पोलिसांनी छापा टाकला असता भाऊसाहेब निवृत्ती माळी,विलास लक्ष्मण साळवे,गणपत तुळशीराम जाधव (रा.तिघे शिंदे ता.जि.नाशिक)व अजीत म्हात्रे (रा.एसटीकॉलनी,पळसे) आदी संशयित आंब्याच्या झाडाखाली कल्याण नावाचा अंक आकड्यावरचा सट्टा नावाचा जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून ५६० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य असा ऐवज हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी पोलिस शिपाई केतन कोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास हवालदार काकड करीत आहेत.