नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बेकायदा दारू विक्री करणा-या दोघांवर शुक्रवारी पोलिसांनी कारवाई करत सुमारे तीन हजार रूपये किमतीचा देशी दारूचा साठा जप्त केला आहे. सिडको परिसरातील वेगवेगळया भागातया ही कारवाई केली. याप्रकरणी अंबड आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिली कारवाई राजीवनगर वसाहतीत करण्यात आली. खबºयाने दिलेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी पोलिसांनी राजीवनगर वसाहतीत धाव घेतली असता संदिप दत्ता वाव्हळ (२३) हा युवक दुर्गा माता मंदिर परिसरातील उंबराच्या झाडामागे एका भिंतीच्या आडोश्याला दारू विक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून ९१० रूपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून याप्रकरणी शिपाई विशाल पाठक यांनी दिलेल्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.
दुसरी कारवाई सिडकोतील दत्तचौक भागात असलेल्या मटन मार्केट भागात करण्यात आली आहे. येथे एक जण बेकायदा दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी पोलिसांनी धाव घेत रोशन प्रदिप सांगळे (३२ रा.दत्तचौक,सिडको) यास दारू विक्री करतांना रंगेहात पकडले. संशयिताच्या ताब्यातून २ हजार ७० रूपये किमतीचा प्रिन्स संत्रा नावाच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या असून याप्रकरणी पोलिस शिपाई शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक पंकज शिरवले करीत आहेत.