नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरात चक्क कारमध्ये गुटख्याची विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून कारसह गुटखा असा सुमारे सव्वा पाच लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव कमलाकर सोनार (रा.घर नं. २२९२ मधली होळी, तिवंधा चौक) व तेजस ओंकार बेलेकर (३० रा. सुर्या कॉम्प्लेक्स, तपोवनरोड द्वारका) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित गुटखा तस्करांची नावे आहेत. द्वारका परिसरातील सर्व्हीस रोडवर दोन तरूण गुटखा विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार भद्रकालीच्या गुन्हे शोख पथकाने सोमवारी (दि.१९) धाव घेत दोघांना ताब्यात घेतले असता कारमध्ये प्रतिबंधीत सुगंधी सुपारी आणि तंबाखू असा सुमारे ५ लाख २४ हजार ७४ रूपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.
दोघांना बेड्या ठोकत पोलिसांनी स्विफ्ट कार आणि गुटख्याचा साठा जप्त केला असून याप्रकरणी पोलिस नाईक कय्युम सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खांडवी करीत आहेत.