नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिक्षाच्या प्रवासात बॅगमधून लूट करणाऱ्या तीन जणांच्या उत्तरप्रदेश टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या टोळीकडून ३ लाख ४२ हजारांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. साजिद वाजीद अली, मुस्तकीन बुंदू पस, सोनू उर्फ मोहमद आबीद मोहम्मद हुसैन ही संशयितांची नावे आहे.
रिक्षात बसलेल्या सहप्रवाशाच्या बॅगेतून पैसे किंवा दागिने चोरणाऱ्या या टोळीचा नाशिक पोलिसांनी भांडाफोड केला आहे. या टोळेचे राज्यभरात नेटवर्क असून, प्रवाशांवर पाळत ठेवून ही टोळी चोरी करत असल्याचे समोर आले आहे. या टोळीच्या चौकशीत तीन गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला आहे. गेल्या २० दिवसांत नाशिकमध्ये वेगवेगळ्या घटनांत महिला तसेच वृद्ध अशा ६ सहप्रवाशांच्या बॅगमधील वस्तू, सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील तीन संशयितांना अटक केली. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने पुणे रोडवरील एका लॉजमध्ये ही कारवाई केली.
बोलण्यात गुंतवून ठेवायचे
या टोळीमधील महिला आणि तिचा सहकारी रिक्षा थांब्यावर थांबत वृद्ध प्रवासी बसलेल्या रिक्षात सहप्रवासी म्हणून बसत असत. रिक्षातील प्रवाशाला संशयित महिला बोलण्यात गुंतवत ठेवत असे व त्याचवेळी दुसरा संशयित प्रवाशाची बॅग उघडून दागिने आणि रक्कम लंपास करत असत.