नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन कारचालकांना दुचाकीस्वारांनी बेदम मारहाण केली. धक्का लागल्याच्या कारणातून रविवारी वेगवेगळया भागात या घटना घडल्या असून त्यात कारचालक जखमी झाले आहेत. याप्रकरणी मुंबईनाका आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात घडली. शाम पद्माकर पाटील (३५, रा. सातपूर कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पाटील रविवारी इंदिरानगर भागात गेले होते. जॉगिग ट्रॅककडून ते सर्व्हीस रोडने आपल्या कारधून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. तपस्वी हॉटेल समोर दुचाकीवर आलेल्या दोघांनी कार अडवून पाटील यांना कट का मारला असा जाब विचारत शिवीगाळ करीत मारहाण केली. या घटनेत पाटील जखमी झाले असून अधिक तपास पोलिस नाईक सानप करीत आहेत.
दुसरी घटनेत सैफअली रईस खान (२७, रा. पखाल रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. खान रविवारी नाशिक पुणे मार्गावरून आपल्या कारमधून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. इस्कॉन मंदिराकडून येणा-या मार्गावर मोपेड दुचाकीवरील दोघांनी कार अडवित खान यांना वाहनाला धक्का लागल्याच्या कारणातून बेदम मारहाण केली. या घटनेत दगड व काही तरी हत्याराने मारहाण करण्यात आल्याने खान जखमी झाले असून अधिक तपास पोलिस नाईक शिंदे करीत आहेत.