नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली कॅम्प येथील भगूर बसस्टॉप जवळ भावासमवेत झालेल्या वादाच्या कारणातून टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत धारदार हत्यारासह दगडांचा वापर करण्यात आल्याने २३ वर्षीय तरूण जखमी झाला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित गायकवाड, साहिल गायकवाड आणि मीर गवारे असे तरूणास मारहाण करणा-या टोळक्याचे नाव आहे. याप्रकरणी सुमित अनिल देशमुख (रा.एमजीरोड,भगूर) या तरूणाने तक्रार दाखल केली आहे. देशमुख बुधवारी (दि.३) रात्री घरी जाण्यासाठी भगूर बसस्थानक येथे थांबलेला असतांना ही घटना घडली.
संशयित त्रिकुटाने त्यास गाठून देशमुख यांच्या भावासोबत झालेल्या वादाची कुरापत काढून ही हाणामारी झाली. यावेळी संतप्त टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला केल्याने देशमुख यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असता दगड फेकून मारल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास जमादार पाचोरे करीत आहेत.