नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगिक वसाहतीतील चुंचाळे शिवारात असलेल्या संविधान चौकात राडा झाला आहे. वाढदिवस साजरा करतांना गर्दी गोंगाट सुरू होता. त्यास विरोध केल्याने टोळक्याने एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आठ जणांच्या टोळक्याविरोधात अंबड पोलिस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चार संशयितांना अटक करण्यात आली आहे.
या घटनेत काही तरी हत्याराचा वापर करण्यात आल्याने ४२ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. विशाल कु-हाडे, जगदिश सोनवणे, कैलास सोनपसारे उर्फ मारी, गणेश उर्फ सोन्या कांबळे (रा.सर्व घरकुल योजना,चुंचाळे शिवार) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून त्यांचे वैभव राजगिरे, रोहित उर्फ शेकड्या, गुरू खतीले, श्याम जाधव आदी साथीदार पसार झाले आहेत. याप्रकरणी शंकर तुकाराम अवचार (३९ रा.घरकुल योजना,संविधान चौक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
संशयित टोळके शनिवारी (दि.३) रात्री संविधान चौकातील रमाई अपार्टमेंट भागात वाढदिवस साजरा करीत होते. जोरजोरात आरडाओरड करून ते कल्होळ करीत असल्याने तक्रारदार शंकर अवचार व त्यांचा मित्र संतोष वामन मोरे (४२ रा.लहुजी चौक,घरकुल योजना) हे दोघे गोंधळ घालू नका असे म्हणाले असता ही घटना घडली. संशयितांनी दोघा मित्रांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करीत मोरे याच्यावर प्राणघातक हल्ला केला. कुठल्यातरी हत्याराने त्यास मारण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या हाणामारीत विशाल कु-हाडे हा संशयितही जखमी झाला असून, त्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मित्र मंडळी केक कापत असतांना शंकर अवचार,संतोष मोरे व दिनकर अवचार यांनी वाद घालून शिवीगाळ व दमदाटी केली. यावेळी एकाने काही तरी हत्यार मारल्याने कु-हाडे जखमी झाल्याचा जबाब नोंदविल्याने याप्रकरणी परस्परविरोधी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मुगले व उपनिरीक्षक पाडेकर करीत आहेत.