नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरफोडी करणा-या चोरट्याला पोलिसांनी गजाआड करुन त्याच्या ६० हजार रूपये किमतीच्या व १२ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या लगड हस्तगत केले आहे. या चोरट्याने दोन घरफोडी केल्याची कबुली दिली असून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.
चौकशीत या चोरट्याने मुंबईनाका हद्दीतील कल्पतरू आणि आडगाव पोलिस ठाणे हद्दीतील श्रीरामनगर भागात घरफोड्या केल्याची कबुली दिली. अखिल उर्फ अनिल सुरेश चव्हाण (२९ रा. मुक्तीधाम, नाशिकरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे.
या कारवाईबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बिटको चौकात एक चोरटा चोरीचा माल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती युनिटचे कर्मचारी राजेश राठोड यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावण्यात आला होता. संशयित चौकात दाखल होताच पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या.संशयिताच्या ताब्यातून चोरीच्या सोन्यापासून बनविलेल्या सुमारे ६० हजार रूपये किमतीच्या व बारा ग्रॅम वजनाच्या दोन लगड हस्तगत करण्यात आल्या असून त्यास मुंबईनाका पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
संशयिताच्या अटकेने अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, विष्णू उगले, हवालदार प्रविण वाघमारे, नाझीम पठाण, धनंजय शिंदे पोलिस नाईक प्रशांत मरकड, विशाल देवरे, विशाल काठे, महेश साळुंके, राजेश राठोड, मुक्तार शेख, आप्पा पानवळ, आण्णासाहेब गुंजाळ आदींच्या पथकाने केली.