नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोलिसाशी हुज्जत घालणा-या दुचाकीस्वारास सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तब्बल आठ वर्षांनी आरोपीस न्यायालयाने त्यास सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शंतनू शंकर सोनवणे (रा.तेली गल्ली,जुने नाशिक) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना २०१५ मध्ये व्दारका परिसरात घडली होती. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक एम.जी.हिरे यांनी करून पुराव्यानिशी दोषारोप जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केले होते. हा खटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय क्र.१ चे न्या. जी.पी.बावस्कर यांच्या समोर चालला. सरकार पक्षाच्या वतीने अॅड.एस.जी.कडवे, अॅड. रविंद्र निकम व अॅड. रेश्मा जाधव यांनी बाजू मांडली असता न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिका-यांनी सादर केलेले पुराव्यास अनुसरून आरोपी सोनवणे यास सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहा महिने साधा कारावास आणि पाचशे रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
कॉलर पकडून झाली होती झटापट
२५ ऑगष्ट २०१५ रोजी व्दारका सर्कल भागात ही घटना घडली होती. याबाबत तत्कालीन वाहतूक शाखेचे कर्मचारी शामराव बापू आहिरे यांनी तक्रार दाखल केली होती. आहिरे धुळयाकडून येवून पुणे मार्गाला जावू पाहणा-या स्कुटीस्वार आरोपीस (एमएच १५ बीबी ७१६६) पोलिस कर्मचारी आहिरे यांनी शिट्टी वाजवून थांबण्याचा इशारा केल्याने हा प्रकार घडला होता. संतप्त स्कुटीस्वार आरोपीने काही अंतरावर आपले वाहन पार्क करून आहिरे यांना गाठले. यावेळी त्याने जवळ येवून मला का थांबविले या कारणातून वाद घातला. यावेळी सदर दुचाकीस्वाराने शिवीगाळ करीत आहिरे यांच्या सरकारी गणवेशाची कॉलर पकडून झटापट केली.
Nashik city crime Police Court Punishment