नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वर्चस्वातून टोळी युध्द होवू लागले असून, गुन्हेगारांची मजल थेट गोळीबारापर्यंत जावू लागल्याने पोलीस आता सक्रीय झाले आहेत. सोमवारी मध्यरात्री गुन्हेगारांच्या वास्तव्य असलेल्या ठिकाण पिंजून काढत पोलिसांनी कोम्बींग ऑपरेशन राबविले. या कारवाई २१७ पैकी १४५ रेकॉर्डवरील गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले आहेत. या कारवाईत चार शस्त्रधारी आणि दोन तडीपारांवर कारवाई करण्यात आली.
आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील वाढता गुन्हेगारी आलेख कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असून सोमवारी मध्यरात्री अचानक पोलिस दल रस्त्यावर उतरले. शहरातील अभिलेखावरील गुन्हेगारांचे राहण्याचे संभाव्य ठिकाणी तपासणी करत त्यांना पोलीस ठाण्यात आणून चौकशीनंतर प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त शिंदे यांनी दिले होते.
या कारवाईत आडगांव, म्हसरुळ, पंचवटी, भद्रकाली, मुंबई नाका, सरकारवाडा, गंगापुर, सातपुर, अंबड, इंदिरानगर, नाशिकरोड उपनगर, देवळाली कॅम्प या पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या नेतृत्वात तसेच पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली फुलेनगर, निलगिरीबाग, नांदूरनाका अश्वमेध नगर, बोरगड, म्हसरूळ भिमवाडी, पंचशीलनगर आदी परिसरात तर उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड, प्रबुद्ध नगर, संतोषीमाता नगर, म्हाडा वसाहत, राजीव नगर, सिन्नर फाटा, जेलरोड, रेल्वे स्टेशन परिसर, सुंदरनगर आदी ठिकाणी व झोपडपट्टी भागात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
या कारवाईत सराईत गुन्हेगार, तडीपार, वाँटेड, वॉरंटमधील संशयितांसह हिस्ट्रिशीटर तपासून ताब्यात घेण्यात आले. तेरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकोणावीस ठिकाणी पोलिसांनी ही धडक कारवाई केल्याने संशयितांसह टवाळखोरांचे धाबे दणाणले आहे. मात्र, या कोम्बिंगमध्ये अजामीनपात्रांसह अन्य कमी गुन्हेगार हाती लागले. त्यामुळे एकूण वाढत्या गुन्हेगारीसह कारवाईबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस आयुक्त गुन्हे, नाशिक शहर यांचे सह गुन्हेशाखा युनिट १ व २ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक,अधिकारी व अंमलदार तसेच गुंडा पथक, अंमली पदार्थ विरोधी पथक, खंडणी पथक, शस्त्र व दरोडा विरोधी पथक या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस आयुक्तालय हद्दीत या मोहिमेत सहभागी होऊन कोम्बिंग ऑपरेशन राबवीण्यात आलेले आहे.