नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगिक वसाहतीतील कामगार नगर भागात जुन्या भांडणाची कुरापत काढून दोघांनी १७ वर्षीय मुलास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी याप्रकरणी यश किशोर गायकवाड (१७ रा. दुर्गा चौक, कामगारनगर) या मुलाने तक्रार दाखल केली असून सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत मुलाच्या पायावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने तो जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय रत्नपारखी (रा.पाटील नगर, त्रिमुर्ती चौक सिडको) व त्याचा एक साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. गायकवाड सोमवारी (दि.१५) आपल्या घर परिसरातील गार्डन मध्ये गेला असता ही घटना घडली.
दोघा संशयितांनी त्यास गाठून जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी एकाने कमरेला लावलेले धारदार शस्त्र काढून त्यांच्या पायावर वार केले. या घटनेत अल्पवयीन बालक जखमी झाला असून,त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास जमादार सय्यद करीत आहेत.