नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुळमालकांनी खरेदीदाराची ४५ लाख रूपयांची फसवणुक केल्याप्रकरणी मुंबई आणि जळगाव येथील पाच संशयिताविरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. बँकेकडे गहाणखत असतांना मिळकतीची परस्पर विक्री करुन ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी हिराजी श्रीपत नंदन (६९ रा. इकोसिटी पाथर्डी शिवार) यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय प्रल्हाद रेलवाणी, पुजा विजय रेलवाणी व जयश्री प्रल्हाद रेलवाणी (रा.तिघे जुहू स्किम,मुंबई) तसेच राजेंद्र विजय पाटील व मिनाक्षी विजय पाटील (रा.दर्यापूर ता.भुसावळ जि.जळगाव) अशी फसवणुक करणा-या संशयितांची नावे आहेत. रेलवाणी व पाटील कुटूंबियांचा शहरातील सर्व्हे नं. ३२३ – १ – १ अ या पैकी प्लॉट नं. २३१३१४ ही मिळकत होती. या मिळकतीवर कर्ज उचलण्यात आल्याने आयसीआयसीआय बँकेकडे ती गहाण आहे. मात्र संशयितांनी ती परस्पर तक्रारदार नंदण यांना विक्री केली.
हा व्यवहार २०१३ मध्ये झाला. बँकेकडे मिळकत गहाण खत असतांना संशयितांनी नंदण यांच्याकडून तब्बल ४५ लाख रूपये स्विकारले. याबाबत त्र्यंबकरोडवरील दुय्यम निंबधक कार्यालय नं.५ येथे खरेदीखत करण्यात आले. कर्ज थकल्याने बँकेने मालमत्तेची पाहणी केली असता हा प्रकार समोर आली असून नंदण यांनी पोलिसात धाव घेतली आहे. इंदिरानगर पोलिसांनी हा गुन्हा मुंबईनाका पोलिसांकडे वर्ग केला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मन्सुरी करीत आहेत.