नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बेदाणा खरेदी विक्रीत एका महिला व्यावसायिकाची कर्नाटक येथील व्यापाऱ्याने साडे तीन लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या सरला गोकुळ गरूड (रा. कार्बन नाका) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वास संपादन करून खरेदी केलेल्या मालाची रक्कम अदा न केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गरूड यांचा बेदाणा खरेदी विक्रीचा व्यवसाय असून कार्बन नाका भागात गौरी फर्म नावाचे त्यांचे दुकान आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात बेंगलोर येथील रिध्दी सिध्दी ट्रेडर्स या फर्मच्या मालकाने त्यांच्याशी संपर्क साधला होता.
यावेळी त्याने बाजार भावापेक्षा जास्त भाव देण्याचे आमिष दाखवून त्यांनी बेदाण्याची मागणी केली होती. त्यामुळे ३० मार्च ते १४ एप्रिल दरम्यान त्यांनी बेंगळुरू येथील व्यापा-यास सुमारे ३ लाख ३० हजार २७५ रूपये किमतीचे बेदाणे पाठविले. मात्र संशयितांने ठकबाजी करण्याच्या उद्देशाने वेळोवेळी बेदाणे खरेदी करून मालाचे पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे गरूड यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक उबाळे करीत आहेत.