नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पखालरोड भागात रस्त्याने पायी जाणा-या ७० वर्षीय वृध्देचे मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी विद्या श्रीराम ठाकूर (रा.ध्रुवांकुर सोसा.जवळ कल्पतरूनगर) यांनी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाकूर या गुरूवारी (दि.११) सायंकाळच्या सुमारास आपल्या बंगला परिसरात फेरफटका मारीत असतांना ही घटना घडली. व्हिला बंगलो समोरील रस्त्याने त्या पायी जात असतांना समोरून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळय़ातील सुमारे ७२ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक गिते करीत आहेत.
वृध्द प्रवाश्याच्या गळयातील सोनसाखळी केली लंपास
महामार्ग बसस्थानक परिसरात बसमधून उतरत असतांना गर्दीची संधी साधत भामट्याने वृध्द प्रवाश्याच्या गळयातील सोनसाखळी हातोहात लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमाकांत आनंदा अलई (८० रा.जिल्हा परिषद कॉलनी, इंदिरानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
अलई गुरूवारी (दि.११) बाहेरगावी गेले होते. सायंकाळच्या सुमारास ते परतले असता ही घटना घडली. महामार्ग बसस्थानकात ते एसटीमधून खाली उतरत असतांना गर्दीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ६५ हजार रूपये किमतीची सोनसाखळी हातोहात लांबविले. अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड करीत आहेत.