नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदाघाटावरील गाडगे महाराज पुल परिसरात खूनाच्या गुह्यात तब्बल तीन वर्षापासून गुंगारा देणा-या संशयितास पोलिसांनी गजाआड केले आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. या आरोपीस मुंबई नाका पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. उदय रामेश्वर वाघमारे (२० रा. वैष्णवरोड, पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
मुंबईनाका पोलिस ठाणे हद्दीत सन.२०२१ मध्ये झालेल्या खूनाच्या गुह्यातील आरोपी असून तो घटनेपासून फरार होता. वेशांतर करून ठिकाणे बदलत असल्याने तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. तीन वर्षापासून त्याच्या मागावर असतांनाच गुरूवारी (दि.२२) युनिटचे कर्मचारी विशाल देवरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. गाडगे महाराज पुलावर तो येत असल्याची माहिती मिळताच पथकाने धाव घेत त्यास जेरबंद केले.
ही कारवाई युनिटचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर, हवालदार प्रविण वाघमारे, नाझीम पठाण, पोलिस नाईक विशाल देवरे, विशाल काठे, आप्पा पनवळ, महेश साळुंके व राजेश राठोड आदींच्या पथकाने केली.