नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आर्टीलरी सेंटर रोड भागात हद्दपारीची कारवाई केलेली असतांनाही शहरात वावर ठेवणा-या तडिपारास पोलिसांनी गजाआड केले आहे. दिपक दिनेश फाजगे (३८ रा.म्हाडा कॉलनी, गांधीधाम, देवळालीगाव) असे अटक केलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फाजगे याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवाया लक्षात घेवून पोलिसांनी त्यास शहर आणि जिह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस त्याच्या मागावर असतांनाच संशयित मंगळवारी (दि.१३) आर्टिलरी सेंटर रोड भागात असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी धाव घेत त्यास बेड्या ठोकल्या. ही कारवाई सुरभी चौकात करण्यात आली. याबाबत हवालदार प्रकाश बोडके यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास जमादार साभाई करीत आहेत.
खंडणीखोर पत्रकाराला अटक
६० हजार रुपयांची खंडणी मागणार्या एका न्यूज चॅनलच्या पत्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे. बातमी देण्याची धमकी देऊन प्रकरण मिटविण्यासाठी ही खंडणी कल्पेश विश्वास लचके (रा. तांबे बिल्डिंग, मखमलाबाद नाका, पंचवटी) या पत्रकाराने मागीतली होती. याप्रकरणी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक गणपतराव पाटील यांनी तक्रार दिली आहे.
पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, लचके याने ८ ते ९ जून रोजी मखमलाबाद नाका येथील लोकशाही न्यूज नावाच्या चॅनलच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले. येथे जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाबाबत भोई नामक इसमाने तक्रार केलेली आहे, तसेच भोई हे तुमच्या विरोधात एसीबीकडे तक्रार करणार आहेत. एवढेच नव्हे, तर तुमच्या विरोधात बातमी देणार आहेत. हे प्रकरण मिटवायचे असेल, तर ८० हजार रुपये द्या असे सांगितले. त्यानंतर ६० हजार रुपयांची रोख रक्कम खंडणी स्वरूपात देण्यास भाग पाडले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात लोकशाही न्यूजचे पत्रकार कल्पेश लचके विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. पी. खैरनार करीत आहेत.