नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्थानबंध्दतेची कारवाई होणार असल्याची कुणकुण लागताच अल्पवयीन मुलीस सोबत घेवून पसार झालेल्या गुन्हेगाराला पोलिसांनी हैद्राबाद येथे अटक केली. गेल्या फेब्रुवारी महिन्यात त्यास स्थानबध्द करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली होती. मात्र तत्पूर्वीच तो पसार झाला होता. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने केली. अक्षय युवराज पाटील (२८ रा.आनंदसागर अपार्टमेंट, श्रमिकनगर, सातपूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित गावगुंडाचे नाव आहे.
सातपूर औद्योगिक वसाहतीसह परिसरात अक्षय पाटील याची मोठी दहशत आहे. ही दहशत कायम राहवी यासाठी तो धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटमार व मारहाणीचे उपद्रव करीत होता. यामुळे परिसरातील नागरीकामध्ये दहशतीचे वातावरण होते. यापार्श्वभूमीवर सातपूर पोलिसांनी त्याच्या विरोधात मार्च २०२१ मध्ये एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई केली होती. मात्र त्याचा वावर शहरातच होता. तडिपार असतांनाही तो आपल्या भागात येवून गुन्हेगारी कारवाया करीत असल्याने गेल्या फेब्रुवारी महिन्यात त्याच्याविरोधात एमपीडीए कायद्यान्वये स्थानध्दतेची कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले होते.
याबाबत कुणकुण लागताच संशयिताने कारवाई टाळण्यासाठी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करीत तिला पळवून नेले होते. गेल्या आठ महिन्यांपासून पोलिस त्याच्या मागावर असतांनाच गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अक्षय पाटील हा अल्पवयीन मुलीसह हैद्राबाद शहरात वास्तव्यास असल्याची माहिती खब-याने दिली. त्यानुसार गुंडा विरोधी पथक हैद्राबाद येथे रवाना झाले होते.
पोलिस पथकाने हैद्राबाद येथे तळ ठोकत संशयितास हुडकून काढले असून अल्पवयीन मुलीसह त्यास पोलिसांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक मोहिते यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार मलंग गुंजाळ,डी.के.पवार,प्रदिप ठाकरे,मिलीन जगताप,मनिषा कांबळे आदींच्या पथकाने केली.