नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथर्डी शिवारातील स्वराज्यनगर आणि सिडकोतील पेलीकन पार्क भागात धारदार शस्त्रांचा धाक दाखवित वेगवेगळया भागात दहशत माजविणा-या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या दोन कारवाईत संशयितांच्या ताब्यातून चार लोखंडी तलवारी आणि कुकरी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर आणि अंबड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली कारवाई सिडकोतील गणेश चौक भागात करण्यात आली. सौरभ शाम पाटोळे (२३ रा.धनलक्ष्मी किराणासमोर,राणेनगर) व सुनिल अशोक गांगुर्डे (रा.स्वामी विवेकानंद नगर,सिडको) हे दोघे सोमवारी पेलीकन पार्क भागातील ओमसाई गॅरेज समोर दहशत माजवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून तीन तलवारी व एक कुकरी हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली. याप्रकरणी युनिटचे कर्मचारी संजय सानप यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक संगम करीत आहेत.
दुसरी कारवाई पाथर्डी शिवारातील स्वराज्यनगर येथील रामस्वरूप अपार्टमेंट परिसरात करण्यात आली. येथे एक तरूण दहशत माजवित असल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांना सोमवारी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाव घेतली असता अनिकेत लक्ष्मण पाटोळे (२५ रा.केवल पार्क,माऊली लॉन्स मागे,खुटवडनगर) हा तरूण दहशत माजवितांना मिळून आला. संशयिताच्या अंगझडतीत धारदार तलवार मिळून आली असून याप्रकरणी शिपाई वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.