नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दहशत माजविणाऱ्या २० जणांना शहर पोलिसांनी तडिपार केले आहे. परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या या कारवाईला पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. गेल्या मार्च महिन्यात बजरंगवाडीत घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे.
बजरंगवाडी परिसरात १५ मार्च २०२३ रोजी रात्री सव्वा दहा वाजता दोन गट समोरा समोर आल्याने तुंबळ हाणामारी झाली होती. यावेळी जाधव आणि तोरडमल गटांत दंगल झाली होती. दोन्ही गटावर पोलिसांतर्फे फिर्याद देत गुन्हा नोंदविण्यात आला. त्यातील जाधव गटातील संशयित मंगेश हिरामण जाधव (वय २४), विशाल सोमनाथ गाढवे (२४), राहुल भिमराज जाधव (२०), सरोज शेरु शेख (२२), रवी सोमनाथ गाढवे (२८), कुणाल दौलत जाधव (२१), प्रकाश श्रीराम सोमवंशी (२७), रुपेश मधुकर पिठे (१९), लखन पंडित ठाकरे (३०) आणि निवृत्ती हरिभाऊ जाधव (३९, सर्व रा. शनिचौक, बजरंगवाडी) यांना तडीपार करण्यात आले. तर, तोरडमल गटातील संशयित संकेत उर्फ दाद्या नंदू तोरडमल (वय २१), चेतन गोपाळ जाधव (२४), प्रकाश रमेश शिंगाडे (२०), रोहन उर्फ रामप्रसाद शर्मा (२०), राहुल अशोक ब्राह्मणे (२४), आदित्य सुनिल गायकवाड उर्फ टग्या मोरे (२०), अल्तमश जावेद शेख (१९), अश्विन सुदाम गवळी (१९), प्रसाद उर्फ परश्या नंदू पवार (१९) आणि पवन विष्णू खाने (२२, सर्व रा. संताजीनगर, बजरंगवाडी) यांना तडीपार करण्यात आले आहे.
उपद्रव टाळण्यासाठी कारवाई
पोलिसांनी याप्रकरणी सर्व संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यात चार विधी संघर्षित बालकांचा समावेश होता. या घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून पोलिसांनी संशयिताचा उपद्रव टाळण्यासाठी त्यांच्यांविरोधात तडीपारीची शिफारस करण्यात आली. विधी संघर्षीत मुले आणि कारागृहात असलेल्या दोघांना या कारवाईतून वगळण्यात आले असून, या प्रस्तावास पोलिस आयुक्तांनी मान्यता दिल्याने २० गुन्हेगाराना शहर व जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
दोन गट एकमेकांना भिडले
१५ मार्च २०२३ रोजी वर्चस्वाच्या वादातून दोन गट एकमेकांना भिडल्याने भितीचे वातावरण पसरले होते. गर्दी पांगवण्यासाठी उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांसह सहायक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज पत्की यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा संशयितांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली. या दंगलीत दोन तरुण जखमी झाले. या दगडफेकीत परिसरातील काही घरांचेही नुकसान झाले होते.