नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदावरी नदी किनारी एका पिस्तूलधारीस पोलिसांनी गजाआड करुन त्याच्या ताब्यातून गावठी पिस्तूल जप्त केले आहे. अनिल दिलीप सकट (३१ रा. खर्जुळ मळा,अनुसयानगर टाकळीरोड) असे संशयित पिस्तूल धारीचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टाकळी रोडवरील गोदावरी नदी किनारी असलेल्या घाटावर एका तरूणाकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.१७) सायंकाळी उपनगर पोलिसांनी धाव घेत संशयितास बेड्या ठोकल्या. त्याच्या अंगझडतीत गावठी पिस्तूल मिळून आला असून याप्रकरणी अंमलदार सौरभ लोंवय यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गोळे करीत आहेत.
जुगार खेळणा-या दोन जणांवर पोलिसांची कारवाई; रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त
जुगार खेळणा-या व खेळविणा-या दोन जणांवर पोलिसांनी कारवाई करत रोकडसह जुगाराचे साहित्य असा सुमारे १४ हजाराचा ऐवज जप्त केला. सातपूर येथील संत शिरोमणी सावता महाराज खोका मार्केट भागात हा जुगाराचा खेळ सुरु होता. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष चंद्रकात उपाध्ये (५३ रा.राज्य कर्म.सोसा. अशोकनगर) व ज्ञानेश्वर दशरथ आहेर (रा.विश्वास नगर, अशोकनगर) अशी संशयित जुगारींची नावे आहेत. खोका मार्केट भागात दोन जण ऑनलाईन जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती पोलिसाना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.१६) रात्री सातपूर पोलिसांनी धाव घेत ही कारवाई केली. खुशी चायनीज दुकानासमोरील रस्त्याच्या कडेला दोघे जण कल्याण टाईम मिलन हा मेन बाजार नावाचा ऑनलाईन जुगार खेळतांना मिळून आले.
संशयितांच्या ताब्यातून रोकड,मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा सुमारे १३ हजार ८४० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी अंमलदार सागर गुंजाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी जुगार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक खरपडे करीत आहेत.