नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगर भागात टोळक्याने धारदार शस्त्राचा धाक दाखवत परिसरात दहशत माजविल्याचा प्रकार मंगळवारी (दि.२०) रात्री घडला. आरडाओरड करीत टोळक्याने एका दुकानाच्या शटरवर कोयता मारून नुकसान केले असून, याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज संजय औतारी (रा.भाजीमार्केट जवळ शिवाजीनगर), आकाश रोशन औताडे (रा.धर्माजी कॉलनी,शिवाजीनगर) व त्यांचे पाच ते सहा साथीदार अशी दहशत निर्माण करणा-या संशयित टोळक्यातील सदस्यांची नावे आहेत. याप्रकरणी विक्रम देवरे (रा.शिवाजीनगर) या व्यावसायीकाने तक्रार दाखल केली आहे. धारदार शस्त्र घेवून आलेल्या टोळक्याने मंगळवारी रात्री भडांगे हॉस्पिटल भागात दहशत माजवित नागरीकांमध्ये भिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड करीत टोळक्याने देवरे यांच्या दुकानाच्या शटरवर कोयता मारला या घटनेत शटरचे नुकसान झाले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.