नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेलरोड येथील लोखंडे मळा भागात हद्दपारीची कारवाई केलेली असतांना धारदार कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजविणा-या गावगुंडास पोलिसांनी गजाआड केले आहे. या संशयिताच्या ताब्यातील कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिपक भाऊसाहेब जाधव (२४ रा.लोखंडेमळा,रूख्मीनीनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. दिपक जाधव याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर त्यास पोलिसांनी शहर आणि जिह्यातून हद्दपार केले होते. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिस त्याच्या मागावर असतांनाच तो मंगळवारी (दि.६) लोखंडे मळा भागात धारदार कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवित असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी धाव घेत त्यास ताब्यात घेतले असता त्याच्या कडे लोखंडी कोयता मिळून आला. याबाबत पोलिस शिपाई सुरज गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.