नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात मंगळवारी ठाणे येथील प्रवासी तरूणासह नवनाथनगर भागात राहणा-या ३८ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड आणि पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना पंचवटीतील नवनाथनगर भागात घडली. ललित मनोज रंगारी (३८ रा.गोरेचाळ,नवनाथनगर) या व्यक्तीने मंगळवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पत्र्याच्या अँगलला तार बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाऊ प्रशांत रंगारी यांनी त्यास तातडीने अपोलो हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉ. राजश्री धुगडे यांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक माळवाळ करीत आहेत.
दुस-या घटनेत सिध्देश सुरेद्र कदम (२५ रा.भोलानगर,कळवा ठाणे) हा युवक कामानिमित्त शहरात आला होता. नाशिकरोड येथील रेल्वे स्टेशन नजीकच्या कैलास लॉज येथे तो मुक्कामी थांबला होता. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास रूम नंबर १० मध्ये व्यवस्थापक रामनाथ उदावंत हे त्याच्याकडे पैश्यांची मागणी करण्यासाठी गेले असता ही घटना उघडकीस आले.
सिध्देश कदम या युवकाने अज्ञात कारणातून रूमचा दरवाजा आतून लावून घेत पंख्याच्या हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेतल्याचे समोर आले. उदावंत यांनी खबर दिल्याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार दराडे करीत आहेत.
सिडकोत पाय घसरून पडल्याने ६१ वर्षीय वृध्दाचा मृत्यू
सिडकोतील सह्याद्री नगर भागात पाय घसरून पडल्याने ६१ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. विजय कुमार कुटी (६१ रा. दिप अपार्टमेंट, सह्याद्रीनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रक्रणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कुटी हे मंगळवारी (दि.६) सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात पाय घसरून पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने त्यांचे भाऊ गोपाळ कृष्ण यांनी तातडीने मेडिकल कॉलेज येथे दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यांना सायंकाळच्या सुमारास मृत घोषित केले. अधिक तपास पोलिस नाईक शिरवले करीत आहेत.