नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेठरोड भागात प्रवास करणा-या तरूणाची वाट अडवित दुचाकीस्वारांनी दमदाटी करीत बळजबरीने मोबाईलसह अॅक्टीव्हावर ताबा मिळवित पोबारा केल्याची घटना वर्दळीच्या ठिकाणी घडली. याप्रकरणी इनायत नसिर खान (२२ रा.शामा पाटकरी लॉज समोर,खडकाळी) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली असून म्हसरूळ पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खान सोमवारी पेठरोड भागात गेला होता. घराकडे तो आपल्या अॅक्टीव्हा दुचाकीने परतत असतांना ही घटना घडली. एचडीएफसी बँक परिसरातील श्रीधर कॉलनीच्या बोर्डाजवळ पाठीमागून स्प्लेंडर मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी त्याची वाट अडविली. यावेळी दोघांनी खाली उतरून कुठलेही कारण नसतांना शिवीगाळ व दमदाटी करीत खान याच्या खिशातील मोबाईल काढून घेतला. तसेच एकाने अॅक्टीव्हाचा ताबा मिळून दोघांनी दोन्ही दुचाकीं काढून राऊ हॉटेलच्या दिशेने पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक घडवजे करीत आहेत.
बापलेकाने केली एकास बेदम मारहाण, गुन्हा दाखल
नांदूरगावात मागील भांडणाची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या एकास बापलेकाने मारहाण केल्याची घटना घडली. महेश अशोक शेंडगे व अशोक माणिकराव शेंडगे (रा.दोघे परफेक्ट कृषी मार्केट जवळ, कमळवाडी,नांदूरगाव ता.जि.नाशिक) असे एकास मारहाण करणा-या बापलेकाचे नाव आहे.याप्रकरणी शंकर गोवर्धन वाडेकर (रा.सम्राट बेकरी,चौंडेश्वरीनगर नांदूरगाव) यांनी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाडेकर यांचा संशयितांचा वाद झाला होता. याबाबत ते मित्रास सोबत घेवून संशयितांच्या घरी विचारपूस करण्यासाठी गेले असता ही घटना घडली. दोघे मित्र विचारपूस करीत असतांना संतप्त बापलेकाने शिवीगाळ करीत वाडेकर यांना धक्काबुक्की केली. यावेळी एकाने घरासमोर पडलेला दगड फेकून मारल्याने वाडेकर जखमी झाले असून अधिक तपास पोलिस नाईक बनकर करीत आहेत.