नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २३ वर्षीय युवकाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना माडसांगवी येथे घडली. युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तुलसीराम पासवान (२३) असे आत्महत्या करणा-या युवकाचे नाव आहे.
पासवान याने रविवारी (दि.२८) रात्री राहत्या ठिकाणी असलेल्या गोडावून मध्ये अज्ञात कारणातून छताच्या अँगलला इलेक्ट्रीक वायर बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉ.आर.वाय.भुसारे यांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस हवालदार डापसे करीत आहेत.
जुगार खेळणाऱ्या ८ जणांवर कारवाई
सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा कंपनी परिसरात जुगार खेळणा-या आठ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत रोकडसह जुगार असा सुमारे ३२ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल दत्ता शेजवळ,सचिन आबासाहेब गांगुर्डे, संतोष बाबुराव गुंजाळ,उमेश चिंतामण गवारे,सुभाष मच्छींद्र महाले,जगन दगडू लभडे,रामदास जगन गायकवाड व नितीन रायलाल पवार अशी संशयित जुगारींची नावे आहेत. महिंद्रा कंपनीच्या अशोकनगर येथील मटेरियल कंपनी समोर जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.२८) डीएस बिल्डींग येथे पोलिसांनी छापा टाकला असता इमारतीतील गाळयांच्या पाठीमागील मोकळया जागेत संशयित पत्यांवर तीन पत्ती जुगार खेळत होते.
संशयितांच्या ताब्यातून ३१ हजार ८०० रूपयांची रोकड, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा सुमारे ३२ हजार ४०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक कातकाडे करीत आहेत.