नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ६२ वर्षीय वृध्दाचा मृतदेह लष्करी हद्दीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रकांत एकनाथ मोजाड (६२ रा. शिंगवे बहुला, देवळाली कॅम्प) असे लष्करी हद्दीत मृत अवस्थेत मिळून आलेल्या वृध्दाचे नाव आहे. दोन आठवड्यांपासून मोजाड बेपत्ता होते. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोजाड गेल्या १० मे पासून बेपत्ता होते. घरात कुणासही काही एक न सांगता ते कोठे तरी निघून गेल्याने कुटूंबियांनी याबाबत देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. कुटूंबियासह पोलिस त्यांचा सर्वत्र शोध घेत असतांना रविवारी (दि.) परिसरातील हारबारा डोंगर ते तांब्याच्या डोंगर या लष्करी हद्दीत त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून तुकाराम मोजाड यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार जगदाळे करीत आहेत.
भरदिवसा घरफोडी
भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे साडे पंधरा हजाराची रोकड लंपास केली आहे. जुना कथडा भागात ही घरफोडी झाली. याप्रकरणी विरसिंह खंजू जाटव (रा.जुना कथडा,टाकळीरोड) यांनी तक्रार दाखल केली असून भद्रकाली पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या आधारे पोलिस भामट्यांचा शोध घेत आहेत.
जाटव कुटुंबिय शनिवारी (दि.२७) सायंकाळच्या सुमारास अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेली साडे पंधरा हजाराची रोकड चोरून नेली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सपकाळे करीत आहेत.