नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ७२ हजाराच्या ऐवज लंपास केला. पाथर्डी शिवारातील प्रशांतनगर भागात ही घरफोडी झाली. त्यात चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे चोरुन नेले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन दादाजी बोरसे (रा.रामप्रसाद रो हाऊस,सप्तशृंगी चौक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बोरसे कुटुंबिय गुरूवारी (दि.२८) अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ७२ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.
तडीपार गुन्हेगारास पोलिसांनी केली अटक
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वावर ठेवणा-या तडीपार गुन्हेगारास पोलिसांनी अटक केली आहे. संशयिताच्या अंगझडतीत धारदार कोयता मिळून आला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिप्रसाद उर्फ राज गौरीलाल जोशी (२८ रा.चित्रकुट सोसा.पांडवनगरी ) असे अटक करण्यात आलेल्या संशयित गुन्हेगाराचे नाव आहे.
जोशी याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्याच्यावर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. शहर आणि जिह्यातून हद्दपार केलेले असतांना शहरातच त्याचा वावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस त्याच्या मागावर असतांना गुरूवारी (दि.२८) रात्री तो पांडवनगरी येथील हनुमान मंदिर परिसरात मिळून आला. संशयिताच्या अंगझडतीत धारदार लोखंडी कोयता मिळून आला असून याबाबत अंमलदार नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten