नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणा-यांवर पोलिसांनी पुन्हा हद्दपारी कारवाईचा बडगा उगारला आहे. वेगवेगळया भागात राहणा-या दोन गावगुंडाना तडीपार करण्यात आले आहे. विकी विकास शिराळ (२४ रा.हनुमान मंदिराजवळ,विहीतगाव) व अनिल मुकेश मगर (२५ रा.जयमाता वैष्णवी सोसा.जाधव संकुल सातपूर) अशी हद्दपारीची कारवाई करण्यात आलेल्या गावगुंडाची नावे आहेत.
शिराळ याची उपनगर पोलिस ठाणे ह्दीत मोठी दहशत आहे. परिसरातील दहशत कायम राहवी यासाठी त्याच्याकडून नागरीकांना मारहाणीच्या घटना वाढल्या आहेत. धारदार शस्त्राने नाहक मारहाण करून जखमी करणे,जबरी चोरी,वाहने पेटवून देणे अशी कृत्य करीत असल्याने पोलिसांनी त्याच्यावर हद्दपारीचा बडगा उगारला आहे. तर मगर याच्या विरोधीत जीवे ठार मारणे,अडवणुक करून दुखापत करणे,अंमली पदार्थ बाळगून त्याचे सेवन करणे,गंभीर दुखापत करणे आदी प्रकारचे गुन्हे सातपूर पोलिस ठाण्यात दाखल आहेत.
संशयितांनी सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत केल्याने पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत,नाशिकरोड विभागाचे सहाय्यक आयुक्त आनंदा वाघ, अंबड विभागाचे सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख आदींनी ही कारवाई केली आहे. सर्व सामान्य नागरीकांचे जनजीवन विस्कळीत करणा-यांबाबत पोलिसांनी कठोर भुमिका घेतली असून संबधीतांच्या गुह्यांचा अभिलेख काढण्याचे कामकाज सुरू आहे. लवकरच त्यांच्यावर महाराष्ट्र पोलिस आणि एमपीडीए अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.
पानटपरी चालकास बेदम मारहाण
वडाळा पाथर्डी मार्गावरील पांडवनगरी भागात सिगारेट देत नाही या कारणातून कुरापत काढून टोळक्याने पानटपरी चालकास बेदम मारहाण करीत लुटल्याची घटना घडली. या घटनेत टोळक्याने पंधराशे रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेत पोबारा केला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज जोशी, गौतम लहाणे व त्यांचे दोन साथीदार अशी पानस्टॉल चालकास लुटणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी सागर उत्तम अदमाने (रा.लक्ष्मण सोसा.पांडवनगरी) यांनी तक्रार दाखल केली आहे. अदमाने यांची पांडवनगरी भागातील सागर स्विट या दुकानासमोर सागर पानस्टॉल नावाचे पान दुकान असून शुक्रवारी (दि.२८) रात्री ते आपला व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली.
पानस्टॉलवर आलेल्या संशयितांनी सिगारेटची मागणी केली मात्र अदमाने यांनी त्यांच्याकडे पैश्यांची मागणी केली असता संतप्त संशयितांनी त्यास शिवीगाळ करीत सिगारेट देत नाही का ? या कारणातून वाद घालत मारहाण केली. यावेळी संशयित टोळक्याने अदमाने यांना दुकानाबाहेर ओढून त्याच्या खिशातील एक हजार ५०० रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेत पोबारा केला असून अधिक तपास उपनिरीक्षक सोनार करीत आहेत.
–