नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालकाच्या घरातील सव्वा तीन लाखाची रोकड घेवून विश्वासू कामगाराने पोबारा केला आहे. दिपक योगी असे संशयित कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी मनोहरलाल गोपीचंद गुलाटी (रा.शिवशक्ती बंगला,प्रसादनगर उत्तमनगर सिडको) यांनी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित गुलाटी यांच्याकडे अनेक दिवसांपासून काम करीत होता. विश्वासू नोकर असल्याने त्याचा घरातही वावर होता. शुक्रवारी (दि.२८) गुलाटी कुटूंबिय आपआपल्या कामात व्यस्त असतांना संशयिताने बंगल्यातील एका बेडरूममध्ये प्रवेश करून ही चोरी केली. बेडरूममधील कपाटातील सुमारे ३ लाख २५ हजार रूपयांची रोकड संशयिताने हातोहात लांबविली. अधिक तपास पोलिस नाईक देशमुख करीत आहेत.
बेकायदा दारू विक्री करणा-या दोघांवर कारवाई, एकास अटक
वेगवेगळया भागात दारू विक्री करणा-या दोघांवर पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. त्यातील एकास अटक करण्यात आली असून या कारवाई मध्ये सुमारे पाच हजार रूपये किमतीचा देशी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी भद्रकाली आणि मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाम संतोष गुप्ता (३२ रा.अनुसयानगर टाकळीरोड) हा शनिवारी तपोवनरोडवरील सुरज टायर या दुकानासमोरील मोकळय़ा जागेत दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी धाव घेत त्याच्या मुसक्या आवळल्या असता त्याच्या ताब्यात सुमारे २ हजार ५५५ रूपये किमतीच्या प्रिन्स संत्रा नावाच्या देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. संशयितास अटक करीत पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला असून याप्रकरणी शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ चे अंमलदार अमोल कोष्टी यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत. दुसरी कारवाई भारतनगर भागात करण्यात आली. नंदिनीनगर भागातील एका पत्र्याच्या शेडजवळ शनिवारी सायंकाळच्या सुमारास कुंदन रावसाहेब माने (३२ रा.शिवाजीवाडी,भारतनगर) हा बेकायदा दारू विक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून सुमारे दोन हजार १०० रूपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलिस शिपाई सागर जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार टेमगर करीत आहेत.