नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोत एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने कार्डची आदला बदल करीत भामट्याने बँकखात्यातील ३७ हजार रूपये परस्पर काढून घेतले. याप्रकरणी भाऊसाहेब लोटन पगार (५१ रा.सिध्दटेकनगर,कामटवाडा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पगार गुरूवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास पैसे काढण्यासाठी पवननगर येथील एटीएम बुथमध्ये गेले असता ही घटना घडली. बुथमध्ये उभ्या असलेल्या दोघा भामट्यांनी त्यांना गाठले. यावेळी मदतीचा बहाणा करून संशयितांनी पगार यांचे एटीएम कार्डची आदलाबदल केली. त्यानंतर भामट्यांनी युनियन बँक आणि एसबीआय बँकेच्या एटीएममधून ३७ हजाराची रोकड परस्पर काढून घेतली. मोबाईलवर याबाबत संदेश प्राप्त झाल्याने पगार यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.
तलवारीचा धाक दाखवित दहशत माजविणारे दोघे ताब्यात
तलवारीचा धाक दाखवित दहशत माजविणा-या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एक जण अल्पवयीन असून संशयितांच्या ताब्यातून तलवार हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश कमलाकर दिवे (रा.नविन बुध्दविहार, एकलहरा गाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्या अल्पवयीन साथीदारास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिस शिपाई वाघचौरे यांनी तक्रार दाखल केली आहे. शिलापूर येथे दोन तरूण तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.१९) रात्री धाव घेत पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेवून अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे लोखडी तलवार मिळून आली. अधिक तपास हवालदार कहांडळ करीत आहेत.