नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोयत्याचा धाक दाखवत दहशत माजविणा-या सराईतास पोलिसांनी गजाआड केले आहे. या संशयिताच्या ताब्यातून धारदार लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आले आहे. सुनिल उर्फ बारक्या यशवंत पगारे (३७ रा.भैरवनगर,संसरीगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवार बाजार परिसरातील नागझरी नाल्याजवळ तो दहशत माजवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.१७) सायंकाळी पोलिसांनी धाव घेत त्यास ताब्यात घेतले असता त्यांच्या अंगझडतीत धारदार लोखंडी कोयता मिळून आला. अधिक तपास हवालदार जगदाळे करीत आहेत.
देवळाली गावात २२ वर्षीय तरूणाची आत्महत्या
२२ वर्षीय तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना देवळाली गाव परिसरात घडली. रूपेश संतोष कर्डीले (२२ रा.सुवर्णा सोसा.आर्टिलरी सेंटर रोड) असे मृत युवकाचे नाव आहे. रुपेशच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कर्डीले याने सोमवारी (दि.१७) सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्याच्या हुकास कपडा बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाऊ सुजित कर्डीले याने त्यास तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार कोकाटे करीत आहेत.