नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चेतनानगर भागात रस्त्याने पायी जाणा-या ५३ वर्षीय महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. याप्रकरणी रश्मी राममोहन बांडेकर (रा.सेंट फ्रान्सेस शाळे मागे,चेतनानगर) यांनी तक्रार दाखल केली असून इंदिरानगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांडेकर या बुधवारी (दि.१२) रात्री जेवण आटोपून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. परिसरातील सेंट फ्रॅन्सेस शाळेसमोरून त्या पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे नऊ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. अधिक तपास हवालदार गारले करीत आहेत.
सातपूरला गावठी पिस्तुल बाळगणारा गजाआड
तिरडशेत परिसरात बेकायदा गावठी पिस्तूल बाळगणा-या एकास पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्या ताब्यातून गावठी पिस्तूल व जीवंत काडतुसे असा सुमारे २५ हजाराचा मुद्देमाल हस्तगतही केला आहे. ही कारवाई दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने केली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव यशवंत लहामगे (३० रा.शिवलीला रो हाऊस,शिवपुरी चौक श्री स्वामी समर्थ नगर,सिडको) असे अटक करण्यात आलेल्या संशयित पिस्तूलधारीचे नाव आहे.
सातपूर परिसरातील तिरडशेत भागात एका तरूणाकडे पिस्तूल असल्याची माहिती दरोडा व शस्त्र विरोधी पथकास मिळाली होती. पथकाने धाव घेत संशयितास ताब्यात घेतले असता अंगझडतीत त्याच्याकडे लोखंडी गावठी पिस्तूल व तीन जीवंत काडतुसे असा सुमारे २४ हजार ५०० रूपयांचा ऐवज मिळून आला. संशयिताने पिस्तूल कोठून व का आणला याबाबत पोलिस शोध घेत असून याप्रकरणी पथकातील अंमलदार संदीप डावरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक उबाळे करीत आहेत.