नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंचवटी कारंजा परिसरातील इंद्रकुंड भागात भरधाव दुचाकीच्या धडकेत जखमी झालेल्या ७६ वर्षीय वृध्देचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात दुचाकीस्वाराविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिक देवेंद्र शेलार (रा.सर्वेश नेहारीका सोसा. पिंटू कॉलनी,जेलरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहेत. याप्रकरणी पोलिस नाईक संदिप बाविस्कर यांनी तक्रार दाखल केली आहे. पेठफाटा परिसरातील कमला बसंत जाल (रा.एरंडवाडी) या वृध्दा गेल्या बुधवारी (दि.२८) दुपारच्या सुमारास मालेगाव स्टॅण्ड येथून पंचवटी कारंजाच्या दिशेने पायी जात असतांना हा अपघात झाला होता.
हिमालया बेकरी समोर त्यांना भरधाव दुचाकीने धडक दिली होती. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. नातू राकेश राजू लाल यांनी पेठफाटा येथील न्यू समृध्दी हॉस्पिटल येथे त्यांना दा्रखल केले असता गुरूवारी (दि.२९) उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरनार करीत आहेत.
अंबड गावात पादचारी महिलेचा विनयभंग
अंबड गावात रस्त्याने पायी जाणा-या महिलेकडे बघून एकाने अश्लिल हावभाव केल्याची घटना घडली. महिलेने याबाबत जाब विचारला असता संशयिताने शिवीगाळ करीत दमदाटी केली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वास शिवाजी आहिरे (३३ रा.अंबड) असे संशयिताचे नाव आहे. पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, गुरूवारी रस्त्याने आपल्या घराकडे पायी जात असतांना संशयिताने तिच्याकडे बघून अश्लिल हावभाव केला. यामुळे महिलेने संशयितास जाब विचारला असता त्याने शिवीगाळ करीत महिलेस दमदाटी केली. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.