नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबडच्या महालक्ष्मीनगर परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या मयूर दातीर खून प्रकरणात पोलिसांनी पाचव्या संशयिताला अटक केली आहे. शुभम दातीर (२२, रा. अंबड) असे त्याचे नाव आहे. धारदार शस्त्र पुरवणे आणि खून होणार असल्याची माहिती असतानाही करण कडूस्कर याने पोलिसांची दिशाभूल केली. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबडच्या महालक्ष्मीनगर येथील हनुमान मंदिर चौकात गुरुवार दिनांक १७ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मयूर केशव दातीर (२१) याच्यावर धारदार शस्त्र, चॉपरच्या सहाय्याने छातीवर तसेच पोटात सपासप वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी संशयित करण अण्णा कडुस्कर, मुकेश मगर, रवी आहेर, यांना आश्रय देणारा राकेश शेलार या चौघांवर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खुनाच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेले धारदार शस्त्र, कुठून व कसे आले. संशयित करण कडुस्कर याला धारदार शस्त्र कोणी पुरवले, याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू होता. यातील मुख्य संशयित कडुस्कर यास हत्यार कुठून आणले, याबाबत विचारणा केली असता त्याने सदरचा चोपर हा यातील मयत मयूर दातीर याचा नातेवाईक शुभम दातीर याने पुरविला असल्याची कबुली दिली. यानुसार अंबड पोलिसांनी शनिवार दिनांक १९ रोजी रात्री संशयित शुभम श्यामराव दातीर (वय २२ रा. अंबड) यास अटक केली आहे. शुभम याची चौकशी केली असता संशयित करण कडुस्कर हा मयत मयूर दातीर याचा खून करणार असल्याची माहिती दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळपासूनच शुभम याला माहिती होती. याच दिवशी शुभम दातीर याने पोलिसांसोबत राहून घटना घडल्यानंतरही संशयित करण कडुस्कर याला पकडून देण्यासाठी मदत करतो, असे पोलिसांना भासवून दिशाभूल केली.
याप्रकरणी शुभम शांताराम दातीर याच्यावर अंबड पोलीस ठाण्यात कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम यास रविवारी न्यायालयात हजर केले असता दिनांक २५ ऑगस्ट पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ २ मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
Nashik City Crime Murder Case Police Investigation
Mayur Datir Cidco