नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सितागुफा जवळ दोन जणांच्या बेदम मारहाणीत कपड्यांच्या कारखानाच्या काम करणा-या परप्रांतीय टेलरचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मोहम्मद साहेब बाबू मोहम्मद मंसूर (२९ मुळ रा.परतैली जि.कटिहार बिहार) असे मृत परप्रांतीय टेलरचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी मोहम्मद इंजमामुल मोहम्मद गुलजार हक (२३ मुळ रा.परतैली बिहार हल्ली एचएमटी ट्रेलर यांचे कारखान्यात मॉडेल कॉलनी,कॉलेजरोड) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. मृत मंसूर आणि हक हे दोघे मित्र मंगळवारी (दि.६) दुपारी सितागुफा भागात गेले असता ही घटना घडली. एकाच गावातील दोघे परप्रांतीय मित्र मॉडेल कॉलनीतील एचएमटी ट्रेलर या रेडिमेड कपडे शिलाई कारखान्यात काम करतात.
दोघे मित्र सितागुफा भागात फिरत असतांना लाल टिशर्ट व काळया रंगाची जिन्स परिधान केलेला केशव नावाचा मुलगा आणि पां-या रंगाचा शर्ट व निळसर रंगाची जिन्स पॅण्ट परिधान केलेल्या तरूणांशी मंसुर याचा वाद झाला. याप्रसंगी बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले असता संतप्त दोघांनी लाकडी दांडक्याने मंसूर व तक्रारदार हक यास बेदम मारहाण केली.
या घटनेत दोघे मित्र जखमी झाल्याचे बघून संशयितांनी पळ काढला. हक यांनी आपल्या मालकाशी संपर्क साधल्याने मालकाने दोघांना जिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून मंसूर यास अधिक उपचारार्थ आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे हलविले असता दुस-या दिवशी दुपारच्या सुमारास उपचार सुरू असतांना मंसूर याचा मृत्यू झाला. हक याच्या जबाबावरून अज्ञात दोघा तरूणांविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मिथून परदेशी करीत आहेत.