नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेलरोडवरील दुर्गा देवी मंदिरासमोर एका युवकाची हत्या करण्यात आली आहे. हेतल हाउसिंग सोसायटीत युवकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. प्रवीण मधुकर दिवेकर (वय ४३) असे मृत युवकाचे नाव आहे. मुंबईहून त्याचे आई-वडील त्याला आज भेटण्यासाठी सकाळी आले तेव्हा प्रवीण दिवेकर हे जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले आढळून आले.
दिवेकर पूर्वी मुंबई येथे राहत होते. पण, कौटुंबिक वादामुळे गेल्या १५ ते २० दिवसांपासून ते नाशिकला राहत होते. दिवेकर यांनी जेवण झाल्यानंतर फोनद्वारे नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यांची खुशाली देखील विचारली होती. त्यानंतर ही घटना घडली. चार महिन्यापूर्वी त्यांच्या मुलाने कौटुंबिक कारणातूनच मुंबई येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
दिवेकर यांची हत्या कशी झाली याबाबत पोलिस शोध घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे माहिती गोळा करण्यात येत आहे. हा खून आहे की अकस्मात मृत्यू याचा तपासही केला जात आहे. दिवेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेची उपनगर पोलिसांना माहिती मिळताच पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक पोलिस उपआयुक्त अंबादास भुसारे, वरिष्ठ पोलिस निरी्षक अशोक शर्माले अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.