नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– तरूणाच्या हातातील मोबाईल हिसकावणा-या चोरट्याला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. मोबाईल हिसकावल्यानंतर तरुणाने आरडाओरड केल्याने चोर नागरीकांच्या हाती लागला. चोप दिल्यानंतर नागरिकांनी या चोराला पोलिसांच्या स्वाधिन केले. जालिंदर राजेंद्र पवार (२२ रा. गौवारो वाघोली, जि.उस्मानाबाद) असे मोबाईल चोराचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी परमवीर तुळशीराम शिंदे (२५ रा.साळसाने ता.चांदवड हल्ली लेखानगर सिडको) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. शिंदे रविवारी (दि.२०) कामानिमित्त त्र्यंबकरोड भागात गेला होता. श्रीराम चौकातील म्हाडा बिल्डींग समोरून तो फोनवर बोलत रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली होती. बसस्टॅण्ड भागात दुचाकीवर आलेल्या संशयित भामट्याने त्याच्या हातातील सुमारे १७ हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. मात्र शिंदे यांनी वेळीच प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्याने काही अंतरावरच भामटा नागरीकांच्या हाती लागला. बेदम चोप देत त्यास पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले असून अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहे.
पाथर्डी फाटा परिसरात लाखोचा गुटखा जप्त
पाथर्डी फाटा परिसरात पोलिसांनी पाच लाखाचा गुटखा जप्त केला आहे. किरकोळ विक्रेत्यांना कारमधून गुटखा पुरवणारा वितरकाच्या घरझडतीत हा प्रतिबंधीत गुटखा मिळून आला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश गोविंद सावंत (रा.राजविहार रो हाऊस,गामणेमळा जवळ पाथर्डी शिवार) असे गुटखा बाळगणा-या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित कारमधून किरकोळ विक्रेत्यांना प्रतिबंधीत गुटख्याचा पुरवठा करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस त्याच्या मागावर असतांनाच सोमवारी (दि.२१) सायंकाळच्या सुमारास तो पाथर्डी फाटा भागात मिळून आला. संशयिताच्या कारमध्ये सुगंधी सुपारी आणि तंबाखू आढळून आल्याने पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता तेथेही गुटख्याचा साठा मिळून आला. या कारवाईत सुमारे ४ लाख ७६ हजार ९४७ रूपये किमतीचा गुटखा हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी पोलिस शिपाई योगेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास अंमलदार सोनवणे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten