नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हातातून मोबाईल पळविणारे दोन चोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एक तडिपार गुन्हेगार आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने ही कारवाई केली. संशयितांना अंबड पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीच्या मोबाईलसह एक कार हस्तगत करण्यात आली असून, मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.
गणेश विष्णू कु-हाडे (२२ रा.भोलेनाथ मंदिराच्या बाजूला इंदिरानगर वसाहत क्र.१,सिडको) व राजेश एकनाथ वाघमारे (२४ रा. लेखानगर, राजीवनगर झोपडपट्टी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून कु-हाडे हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. युनिटचे राहूल पालखेडे व राजेश राठोड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. दोन चोरटे बुधवारी (दि.१९) लेखानगर वसाहतीतील इलेक्ट्रीक रोहित्र भागात मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावण्यात आला होता.
चारचाकीतून आलेल्या संशयितांवर पोलिसांनी झडप घातली आणि त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चोरीचे मोबाईल मिळून आले. संशयितांच्या मुसक्या आवळत पोलिसांनी मोबाईलसह त्यांच्या ताब्यातील कार असा सुमारे एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला असून संशयितांना अंबड पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई सहाय्यक आयुक्त डॉ.सिताराम कोल्हे व वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर,उपनिरीक्षक विष्णू उगले,हवालदार प्रविण वाघमारे,नाझिमखान पठाण,महेश साळुंखे,प्रशांत मरकड,विशाल देवरे,राहूल पालखेडे,राठोड,मुक्तार शेख,गौरव खांडरे,अमोल कोष्टी,जगेश्वर बोरसे,चंद्रकात गवळी आदींच्या पथकाने केली.