नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चोरीस गेलेल्या मोबाईलमधील फोन पे वरून दुस-या नंबरवर पैसे ट्रान्सपर करणा-या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी गजाआड केले आहे. आदर्श सदाशिव निंबाळकर (२१ रा.आशियाना बंगल्या समोर, आंबेडकरवाडी, सरोज बाबा नगर, नाशिक पुणे रोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. निंबाळकर सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरूध्द खून आणि जबरीचोरीचे गुन्हे दाखल आहेत.
याप्रकरणी विशाल लक्ष्मण दावड (रा.गोविंदनगर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. दावड शुक्रवारी (दि.२३) दुपारी आरडी सर्कल कडून इंदिरानगर बोगद्याच्या दिशेने मोबाईलवर बोलत रस्ताने पायी जात असतांना ही घटना घडली होती. मनोहर गार्डन परिसरात पाठीमागून अॅक्टीव्हावर आलेल्या भामट्याने त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून पोबारा केला होता.
यामुळे दावड यांनी मुंबईनाका पोलिस ठाण्यात धाव घेत रितसर तक्रार देत असतांनाच दुस-या मोबाईलवर बँक खात्यातील १९ हजार ७०० रूपये काढल्याचा संदेश प्राप्त झाल्याने संशयित पोलिसाच्या जाळयात अडकला. चोरीस गेलेल्या मोबाईलमधील फोन पे वरून दुस-या नंबरवर पैसे ट्रान्सपर होताच पोलिसांनी सदर नंबरचा शोध घेतला असता तो पोलिस रेकॉर्डवरील आदर्श निंबाळकर याचा फोन नंबर असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी वेळीच चक्र फिरवीत संशयिताला त्याच्या घरातून अटक केली असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.