नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वेगवेगळया भागात राहणा-या एका अल्पवयीन मुलासह मुलगी बेपत्ता झाली आहे. गेल्या काही दिवसापासून अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. सदर मुलांचे कुणीतरी अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जात असून याप्रकरणी अंबड आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना जेलरोड भागात घडली. भगवा चौकात राहणारी अल्पवयीन मुलगी शुक्रवारी (दि.३०) बेपत्ता झाली. सर्वत्र शोध घेवूनही ती मिळून न आल्याने कुणीतरी पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मुंन्तोडे करीत आहेत.
दुसरी घटना सिडकोत घडली. येथील अल्पवयीन मुलगा मंगळवार (दि.२७) पासून बेपत्ता आहे. त्यास कुणीतरी फुस लावून पळवून नेल्याचा अंदाज बांधला जात असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक शिरवले करीत आहेत.