नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील एका वकिलास दहा लाखाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. अल्पव्याजदरात कर्ज काढून देतो अशी बतावणी करीत एकाने आगाऊ व्याज व टिडीएस खर्चापोटी रक्कम बँक खात्यावर जमा करण्यास भाग पाडून ही फसवणूक केली आहे. अंबादास सायबू ओरसे (रा.प्रतापसिंह नगर,इंदापूररोड अकलूज ता.माळशिरस जि.सोलापूर) असे वकिलास गंडा घालणा-या संशयित ठकबाजाचे नाव आहे.
या फसवणूक प्रकरणी अॅड. विकास थोरात यांनी तक्रार दाखल केली आहे. गेल्या जानेवारी महिन्यात संशयित व वकिल थोरात यांच्यात भेट झाली होती. अॅड. थोरात यांच्या जिल्हा न्यायालयातील चेंबर मध्ये आलेल्या संशयिताने कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले. दोन कोटी रूपयांच्या कर्जासाठी एक टक्के व्याज दर असेल असे सांगण्यात आल्याने अॅड. थोरात कर्ज घेण्यास तयार झाले.
कर्जासाठी लागणारी कागदपत्र संशयिताकडे सुपूर्द करताच त्याने आगाऊ व्याज आणि टीडीएस खर्चाची मागणी केली. त्यामुळे अॅड. थोरात यांनी गेल्या आठ महिन्यात टप्याटप्याने दहा लाखाची रोकड संशयिताच्या बँक खात्यात जमा केली. मात्र अनेक महिने उलटूनही कर्जाची रक्कम पदरात न पडल्याने अॅड.थोरात यांनी संशयिताशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच अॅड. थोरात यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
एटीएम कार्डची बदली करुन रोकड लंपास
कार्डधारकाच्या अशिक्षीत पणाचा लाभ उठवित भामट्याने एटीएम कार्डची आदलाबदल करुन ५४ हजाराची रोकड परस्पर लंपास केली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भाऊसाहेब माधव शिरसाठ (रा.देवपुर ता.निफाड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
शिरसाठ शुक्रवारी कामानिमित्त शहरात आले होते. निमाणी बसस्थानक परिसरातील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम बुथमध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता ही घटना घडली. पैसे काढत असतांना भामट्याने त्यांना गाठले. पैसे काढल्यानंतर ते बुथमधून बाहेर पडत असतांना भामट्याने त्यांना बॅकेचा चार्ज लागेल असे सांगून पुन्हा मशिनमध्ये एटीएम कार्ड टाकण्यास भाग पाडले. यावेळी मदतीचा बहाणा करून भामट्याने कार्ड हातोहात लांबविले. त्यानंतर संबधीताने आदलाबदल केलेल्या एटीएम कार्डच्या माध्यमातून परस्पर बँक खात्यातील ५४ हजार रूपयांची रोकड काढून घेतली असून याबाबत संदेश प्राप्त होताच शिरसाठ यांनी पोलिसात धाव घेतली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक परदेशी करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik City Crime Lawyer ATM Card Cheating Theft